गुजरातमध्ये पर्यटनासाठी आलेल्या ७ जणांचा जागीच मृत्यू

Foto
अहमदाबाद : गुजरातच्या भुज-खावडा राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री अत्यंत भीषण अपघात झाला. खावडाजवळ ट्रेलर आणि कारची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून तिचे दोन तुकडे झाले आहेत. या अपघातात एका जवानाच्या कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री वेकारिया परिसरात हा अपघात घडला. कारमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य प्रवास करत होते. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांसह सात जणांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी भीषण परिस्थिती होती.

उत्तराखंडचं हे कुटुंब कच्छ फिरण्यासाठी आलं होतं. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांची अवघ्या ३ महिन्यांची मुलीचा समावेश आहे. शनिवारी रात्री  ९:३० वाजण्याच्या सुमारास ही कार खावडाहून भुजच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. ट्रेलरची धडक इतकी जोरदार होती की कारचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर घटनास्थळावरील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं. महामार्गावर मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत पडले होते.

सौरव सिंह, जसपाल सिंह नेगी, सविता सौरवसिंह नेगी, सिविका सौरवसिंह नेगी, रिंकी नितिन गुंसाई, वामिका नितिन गुंसाई, राजेशसिंह रावत आणि रक्षिता राजेश रावत अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि १०८ रुग्णवाहिकांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी भुज येथील जी.के. जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णालयात पोहोचले. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.